‘एमआयएम’सह राज्यातील १९१ पक्षांची नोंदणी रद्द

राज्यातील लहान-मोठय़ा १९१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रातील वादग्रस्त ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलीस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम), तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या विकास आघाडीसह रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचा यामध्ये समावेश आहे. नोटिसा बजावूनही प्राप्तिकर विवरणपत्रे व लेखापरीक्षणाची कागदपत्रे सादर न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही कारवाई केली राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त पक्षांचा समावेश आहे. उर्वरित ३४२ पक्षांना मान्यता नाही.

या राजकीय पक्षांना नोंदणी आदेशानुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याची व लेखापरीक्षणाची कागदपत्रे दर वर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

ही कागदपत्रे सादर न करणाऱ्या ३२६ पक्षांना विविध टप्प्यांत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही विहित कालावधीत कागदपत्रे सादर न करणाऱ्या १९१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाईमुळे या पक्षांना मोठा हादरा बसला आहे.

रद्दबातल करण्यात आलेले काही राजकीय पक्ष

ऑल इंडिया क्रांतिकारी पक्ष, शिवराज्य पक्ष, सत्यशोधक समाज पक्ष, जनादेश पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, सार्वभौमिक लोक दल, राष्ट्रवादी-समाजवादी पार्टी, महाराष्ट्र राजीव काँग्रेस, एस. राष्ट्रीय जनहित पक्ष, राष्ट्रीय सर्व समाज पार्टी, दलित- मुस्लीम- आदिवासी क्रांती संघ, राष्ट्रीय महाशक्ती पार्टी, इंडियन नॅशनल पार्टी, जनकल्याण सेना, आंबेडकरवादी जनमोर्चा, राष्ट्रीय भीमसेना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना, घरेलू कामगार सेना, रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे गट), नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमॉक्रॅटिक), भिवंडी विकास आघाडी, आगरी समाज विकास आघाडी, बहुजन विकास सेना, गोंडवाणा गणतंत्र पार्टी.