संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील  ७० हजार आशा सेविकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना केवळ आणि केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली, याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे.  आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ‘आशां’नी करोना गाव मुक्तीसाठी काम करावे, असे आवाहन केले आहे.

‘आशां’ना किमान १३ हजार रुपये मानधन द्यावे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी  ‘महाराष्ट्र राज्य आशा— गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’चे अध्यक्ष एम. ए. पाटील  यांनी केली.  १५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘आशां’ना प्रतिदिन ३०० रुपये शहरी भागात, तर ग्रामीण भागात हजार रुपये महिना याचा अर्थ ३५ रुपये रोज या दराने काम करण्यास भाग पाडले जाते .  त्यांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नियमित दिल्या गेल्या नाहीत, असे आशा संघटनांचे नेते शंकर पुजारी यांनी सांगितले.