News Flash

सनातन ही दहशतवादी संघटना – आशिष खेतान

सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे.

सनातन संस्था ही एक दहशतवादी संघटना असून, ही संस्था हिंदू समाजाला लागलेला कलंक असल्याची टीका आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी ट्विटरवरून केली.
अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी मुंबईतून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. तीन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडावरून झालेली ही पहिलीच अटक असून या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती. खेतान यांनी काही दिवसांपूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा होणार असे ट्विट केले होते. त्यानंतर आज वीरेंद्रसिंह तावडेच्या अटकेनंतर आशिष खेतान यांनी काही ट्विटसच्या माध्यमातून याप्रकरणावर भाष्य केले आहे. ‘सनातनने उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष लोकांची एक यादी बनवली असून त्यांचा काटा दूर करण्याचा कट आखला आहे. सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे. तावडेच्या अटकेमुळे याप्रकरणी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणातील सीडी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात युपीए सरकार अपयशी ठरले’ असे खेतान यांनी ट्विटरद्वारे म्हटले. तसेच, मोदी सरकार सनातन संस्थेविरोधात कडक पावलं उचलून, सनातनला नष्ट करेल. शिवाय, या संस्थेवर बंदी आणून जयंत आठवले आणि सनातनच्या इतरांना तुरुंगात पाठवेल, अशी आशा आशिष खेतान यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आल्यानंतर ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 10:54 am

Web Title: ashish khetan tweeted sanatan is a terrorist organization a blot on hindu society
टॅग : Narendra Dabholkar
Next Stories
1 मुंबईत पावसाचे आगमन, तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक मंदावली
2 मुंबई पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला
3 ‘सम-विषम’ सूत्र कितपत व्यवहार्य?
Just Now!
X