भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका जानेवारी अखेरीपर्यंत पार पडणार असून मुंबई अध्यक्षपदी पुन्हा अॅड. आशीष शेलार यांनाच संधी मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत आक्रमकपणे तोंड देण्यासाठी अॅड. शेलार यांच्याकडेच ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
भाजपमधील पक्षांतर्गत निवडणुका लांबल्या असून आता जानेवारी महिन्यात पहिल्या १५ दिवसांत तालुका पातळीपर्यंतच्या तर दुसऱ्या पंधरवडय़ात जिल्हा पातळीवरील निवडणुका पार पडतील. त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेशी युती होण्याची सुतराम शक्यता नसल्याने जोरदार संघर्ष होईल. शेलार यांना शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीतही तीच भूमिका घ्यावी लागणार आहे.