आशीष शेलार यांचा आरोप

मुंबई : राज्य सरकारने घेतलेला रात्रजीवनाचा निर्णय म्हणजे ‘किलिंग लाइफ’ असल्याची टीका करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी कमला मिलमधील चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) गैरव्यवहाराला पर्यटनाच्या नावाखाली नियमित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

कमला मिलमध्ये दोन वर्षांपूर्वी म्हणजे २९ डिसेंबरला वन अबाऊव्ह व मोजो ब्रिस्तरो रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कमला मिलमध्ये माहिती तंत्रज्ञान पार्क (आयटी पार्क) साठी चार एफएसआय मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात १० वापरण्यात आला आहे. पब, बार मोठय़ा प्रमाणावर झाले असून ही अनधिकृत बांधकामे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रोखली नाहीत. आता राज्यात सत्ताधीश झाल्यावर ही अनधिकृत बांधकामे पर्यटनाच्या नावाने वाचविण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. पब,बारमुळे निवासी भागातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांवरही सुरक्षेचा ताण वाढणार आहे. त्यामुळे रात्रजीवनास आमचा विरोध असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. कमला मिलमधील ज्या दोन पब्जना आग लागली, त्यांना तत्पूर्वी २४-२५ डिसेंबरच्या रात्री आताच्या सरकारमधील एका मंत्र्यांनी भेट दिली होती, असा आरोप करीत ते मंत्री कोण होते, त्याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

शाळांमध्ये संविधान वाचन करण्याच्या निर्णयाचे शेलार यांनी स्वागत केले आहे. मात्र त्यानंतर कोणी भारतमाता की जय, वंदे मातरम म्हटल्यास कारवाई करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, रात्रजीवनाच्या निर्णयावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही टीका केली असून हा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी घेतला आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.