मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचा सवाल; न्यायालयावर ताशेरे ओढण्याचे हे रिकामटेकडे उद्योग!

दहीहंडीच्या मुद्दय़ावर आता मनसेच्या पोपटाला कंठ फुटला आहे, तर शिवसेनेच्या उद्धवाला आता हा हिंदूंचा सण असल्याची आठवण होत आहे. गेली दोन वर्षे दहीहंडीप्रकरणी भाजप व सरकार न्यायालयात लढत होते. तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे कोठे होते, असा रोखठोक सवाल भाजपकडून उपस्थित केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरू असताना शिवसेना व मनसे या कायदेशीर लढाईत का सहभागी झाले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सरकार व न्यायालयावर रिकामटेकडे ताशेरे झाडून सवंग लोकप्रियता मिळविण्याचे ‘मनसे’  ‘शिवउद्योग’ सुरू झाल्याचा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी लगावला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडीचे उत्सवी स्वरूप जाऊन धंदेवाईकपणा आला आणि पैशाची प्रलोभने दाखवून राजकीय नेत्यांनी गोविंदांच्या जीवाशी खेळण्याचा जो उद्योग चालविला, तेव्हा राज व उद्धव हे झोपले होते काय, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

न्यायालयाच्या भूमिकेनुसार दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून लोकप्रिय होण्यासाठी गेल्या वर्षीपासून वीस फुटांपर्यंत हंडी लावून अनेक ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले. जोगेश्वरी, भांडूप, लालबाग, बोरिवली अशा चार ठिकाणी पाचशे मंडळांच्या माध्यमातून स्पर्धाचे आयोजन केले.  वांद्रे येथे अंतिम सामना घेतला जाणार आहे. भाजप यासाठी मेहनत घेत आहे आणि गोविंदा मंडळेही मोठय़ा प्रमाणात साथ देत असताना मनसे का गप्प होती, असा सवाल करून शेलार म्हणाले,  न्यायालयात अवमान याचिकेचा ‘सामना’ मी करत आहे. त्यामुळे सेना-मनसे असो की काँग्रेसचे संजय निरुपम असो यांच्या नौटंकीला गोविंदा आणि मराठी माणूस भूलणार नाही, असेही शेलार यांनी सांगितले.

‘निवडणुकीच्या तोंडावर पोपटपंची’

दहीहंडीची उंची मंडळांना ठरवू द्या असे राज ठाकरे आज सांगत आहेत. मग एवढय़ा वर्षांत राज यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन उंचीची व्याख्या का ठरवली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. स्वत: न्यायालयात जायचे नाही की गोविंदांमध्ये सहभागी व्हायचे नाही, मात्र पालिका निवडणुकीच्या तोंडावर सवंग लोकप्रियतेसाठी केवळ पोपटपंची  करायची याला लोक आता भूलणार नाहीत, असे शेलार यांनी सांगितले.

  • मुंबईत गेल्या पाच वर्षांत दहीहंडी फोडताना गोविंदा पथकातील ११७१ तरुण मुले गंभीररीत्या जखमी झाली, तर पाच जणांना आपल जीव गमवावा लागला.
  • जखमी झालेल्या गोविंदांपैकी काहींना कायमचे अपंगत्व आले असून त्यांची जबाबदारी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी का घेतली नाही, असा सवालही आता केला जात आहे.
  • २०१५ मध्ये १२९ जखमी, एकाचा मृत्यू
  • २०१४ मध्ये २०२ जखमी, एकाचा मृत्यू
  • २०१३ मध्ये ३१५ जखमी, २ मृत्यू
  • २०१२ मध्ये १०० जखमी, एकाचा मृत्यू
  • २०११ मध्ये २२५ जखमी
  • २०१० मध्ये १७० जखमी