“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक आहे”, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा मुद्दा सध्या गाजत आहे. करोनामुळे प्रवासानंतर क्वारंटाइन होण्याची सक्ती असल्यानं आणि गणेशोत्सवाला मोजकेच दिवस शिल्लक असल्यानं विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावरून भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी परब यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीने कोकणात जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही, क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर

“आजपासून एसटीचे बुकिंग सुरु होणार असेल तर मग कसा प्रवास होणार? १० दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनानं घेतला, तरी ग्रामपंचायतीनं १४ दिवसांचा निर्णय घेतला त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या का मागण्यात आल्या नाही? एसटीने जाणार त्या़ंना ई-पास नाही मग खाजगी गाडीसाठी का? शासनाने १० दिवस क्वारंटाइन असं घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खाजगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ २५० रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोड असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

अनिल परब काय म्हणाले?

“कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचायचं आहे. क्वारंटाइन होण्याचा कालावधी हा १० दिवसांचा करण्यात आला आहे. जे कोकणात जातील ते सगळे होम क्वारंटाइन होतील. अनेकांनी आम्हाला १२ तारखेनंतर कोकणात जायचं असल्याची विनंती केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून १२ तारखेनंतर जाणाऱ्यांना जाण्याच्या ४८ तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी दिली जाईल,” असं अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.