भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचं विशेष कौतुक केलं आहे. त्याचं काम महाराष्ट्राची मान उंचावणारं आहे, अशा शब्दांत त्यांनी तेजस यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

सामना या वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ट्विटरवरुन शेलार यांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलं आहे. शेलार म्हणाले, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे.”

आणखी वाचा- तेजस ठाकरेंना सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमध्ये हिरण्यकश नदीत सापडला नवा मासा; नाव ठेवलं…

संपूर्ण कुटुंब राजकारणात असूनही राजकारणापासून लांब राहणाऱ्या तेजस ठाकरे यांना जैवविविधतेतील संशोधनात रस आहे. यासाठी ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कायमच भटकंती करीत असतात. नुकतीच त्यांनी माश्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली. अंबोली गावमधील हिरण्यकश नदीमध्ये त्यांनी सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा शोधला आहे. सोनेरी रंगाचे केस असणारी ही माशांची २० वी प्रजाती असून तेजस ठाकरेंनी शोध लावलेली चौथी प्रजाती आहे. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पाली आणि खेकड्यांच्या दुर्मिळ प्रजाती शोधल्या आहेत.

तेजस ठाकरे यांनी लावलेल्या या शोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनाही मान्यता दिली आहे. या प्रजातीसंदर्भातील लेख नावाजलेल्या मासिकांमध्ये छापून आले आहेत. ही प्रजाती हिरण्यकश नदीत सापडल्यामुळे त्याचे नाव हिरण्यकेशी असं ठेवण्यात आलं आहे. हिरण्यकेशी हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सोनेर रंगाचे केस असणारा असा होतो. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांनी केलं. त्यांनीच या संशोधनासंदर्भातील पेपर सादर केला आहे. या संशोधन कार्यात प्रवीणराज आणि तेजस यांना पाण्याखाली छायाचित्रण करण्यासाठी प्रसिद्ध असणारे छायाचित्रकार शंकर बालसुब्रमण्यम यांचे सहकार्य मिळाले.