पावसाळ्याला सुरूवात होण्याआधी मुंबईत नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. पावसाचं पाणी तुंबणार नाही, याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेकडून ही उपाययोजना केली जाते. यंदाही नालेसफाईचं काम झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेला धारेवर धरलं आहे. “टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे” असं शेलार यांनी अनेक प्रश्न केले आहेत.

पावसाळा सुरू झाला आहे. अद्याप मुंबईत पाऊस दाखल झालेला नसला तरी नालेसफाईचं काम महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तसा दावा महापालिकेनं केला आहे. महापालिका आयुक्तांनी नालेसफाई बाबत केलेल्या दाव्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून, त्यात नालेसफाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- “बाबुभैया? ये क्या चल रहा है?”; आशिष शेलारांचा सरकारवर ‘हेराफेरीचा’ आरोप

“मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा ‘डोंगर’ उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळे दावे वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ वर्षानुवर्षे सुरू आहे,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“मुंबईकर म्हणतात ४० टक्के पेक्षा जास्त सफाई झालेली दिसली नाही. त्यामुळे ११३ टक्केचा दावा २२७ टक्के खोटा आहे. जर नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काट्याची आकडेवारी जाहीर का करीत नाही? सीसीटीव्ही फुटेज का जाहीर करीत नाही? ही नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई,” असं म्हणत शेलार यांनी महापालिकेला प्रश्न विचारले आहेत.

पालिकेची संपूर्ण यंत्रणा करोनाच्या लढाईत गुंतलेली असल्यामुळे यंदा नालेसफाई नीट झालेली नाही, पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार अशी टीका विरोधक करीत होते. परंतु टाळेबंदीमुळे कामगारांअभावी यावर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली होती. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तीन पाळ्यांमध्ये काम करण्याचे आदेश दिले होते. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करत महानगरपालिकेच्या यंत्रणेने पावसाळापूर्व कामे पूर्ण केल्याचा तसेच यावर्षी ११३ टक्के गाळ काढल्याचा दावा पालिकेने केलेला आहे..