मुंबई पालिकेवरून आशीष शेलार यांची विधानसभेत शिवसेनेवर कुरघोडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या सजगतेमुळेच मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांना आळा बसल्याचे सांगत आशीष शेलार यांनी भाजप आणि शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला थेट विधानसभेत सोमवारी वाट करून दिली.
मुंबई आणि कोकणाच्या विकासावरील भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होताना शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. रस्त्यांच्या कामांमध्ये वर्षांनुवर्षे गैरव्यवहार होत असे. या संदर्भात आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यावर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामात किंमत जास्त दाखविण्यात आल्याचे आढळले. आतापर्यंत ठेकेदारांच्या विरोधात कधीच कारवाई झाली नव्हती, पण मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने ठेकेदारांना तुरुंगाची हवा खावी लागली. मोकळ्या जागा दत्तक देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला, पण यातून मुंबईकरांना मोकळी मैदाने मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली गेली. भाजपच्या आमदारांनी या संदर्भात लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्या ठरावाला स्थगिती देऊन मुंबईकरांना दिलासा दिला.
मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. पण काही जण या मेट्रोला का विरोध करतात, असा सवालही शेलार यांनी केला. मेट्रो-३ प्रकल्प तसेच आरेमधील कारशेडवरून शिवसेनेने विरोध केल्याच्या पाश्र्वभूमीवर शेलार यांच्या विधानाला महत्त्व येते. मुंबई मेट्रोचे रिलायन्स मेट्रो हे नामकरण कसे झाले आणि भाडे ठरविण्याच्या पद्धतीत गोंधळ का झाला, याची चौकशीची मागणी शेलार यांनी केली.

कोकण डॉलरभूमी
मत्सव्यवसाय, हापूस आंबे आणि पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळू शकते. पण यासाठी सरकारने कोकणाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी चर्चेला सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी केली. कोकण ही ‘डॉलरभूमी’ असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. देशातील सर्व प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरण झाले पण मुंबई-गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ, कोकणासाठी पुढील दहा वर्षे प्रत्येकी दोन हजार कोटी देण्याची मागणी त्यांनी केली.