मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३९,०३८,८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज(बुधवार) पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला. या अर्थसंकल्पावरून भाजपाकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?” अशा शब्दांमध्ये शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर निशाणा साधताना आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणतात, “ बुलेट ट्रेनला विरोध…मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा…कारभारी नव्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करणार..आणि पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार..चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय? कमी व्याजावर ७७ हजार कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देणारी महापालिका…दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरणार..एकीकडे महसूलात घट, कर्ज घेणार सांगणारी महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान १६.७४ टक्के वाढणार..फसलेला ताळमेल अन् सगळा आकड्यांचा खेळ!”

तसेच, “करात वाढ नसली तरी शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण घोषित करून शुल्क वाढीच्या नावाने खिसा कापण्याचे सूतोवाच आहेच. समुद्राचे पाणी गोडे करणे, वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे..हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?” असा खोचक प्रश्न देखील शेलार यांनी यावेळी विचारला आहे.

“ कारभाऱ्यांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेला..धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे ५ हजार ८६७ कोटी महसूलात घट असलेला..पालिकेला ५ हजार ८७६ कोटींने कर्जबाजारी करणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे..रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट!” अशा शब्दांमध्ये शेलार यांनी या अर्थसंकल्पावरून शिवसेनेवर टीका केलेली आहे.