अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर; मोदींवर टीका

केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात गरीब व मध्यमवर्गीयांसाठी केवळ २५ लाख नव्हे, तर तब्बल दोन कोटी २४ लाख ३७ हजार घरे बांधण्यात आली, असे प्रत्युत्तर  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

शिर्डी येथील कार्यक्रमात गृहनिर्माण योजनांबाबत पंतप्रधान जनतेची दिशाभूल करणारी माहिती देतात, याचे दु:ख होते, असे चव्हाण म्हणाले. यूपीए सरकारने चार वर्षांच्या काळात २५ लाख घरे बांधली आणि तेवढय़ाच कालावधीत एनडीए सरकारने १ कोटी २५ लाख घरे बांधल्याचा खोटा दावा करून पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल केली आहे.

२००४ ते २०१३ या यूपीए सरकारच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेंतर्गत २ कोटी २४ लाख ३७ हजार घरे बांधली. म्हणजेच यूपीए सरकारच्या काळात प्रतिवर्ष २५ लाख घरे बांधून पूर्ण केली. मोदी सरकारला पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण करता आले नाही. हे त्यांच्या सरकारने दिलेल्या आकडेवारीवरूनच सिद्ध झाले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पंतप्रधान खोटे बोलण्याचे दु:साहस करत आहेत. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरे बोलण्याची सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.