काँग्रेस नेत्यांचा आमदारांना सवाल; आजपासून आक्रमक
लोकसभेत ४४ खासदार सत्ताधारी भाजपला पार पुरून उरतात, मग राज्य विधानसभेत तेवढय़ाच संख्येने आमदार असले तरी काँग्रेसचा प्रभाव का पडत नाही, असा खोचक सवाल पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदारांना बुधवारी केला. या अधिवेशानत भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करून भाजपविरोधातील मोहीम काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे.
सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची संधी असताना काँग्रेसचे आमदार मैदानातून पळ काढतात, अशी टीका केली जाते. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आमदारांना उपदेशाचा ढोस पाजला. पायऱ्यांवर बसून वेळ घालवू नका, त्यापेक्षा सभागृहात बसून मंत्र्यांना जाब विचारा, असा सल्ला राणे यांनी दिला. ‘मुंबई तरुण भारत’ वृत्तपत्रावरून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. विरोधी पक्षनेते असताना तावडे काँग्रेसच्या मंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करायचे, आता त्यांच्याकडून नियमांचा भंग झाल्यावर त्यांचीही कोंडी करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. विषयानुरूप आमदारांचे गट
नगरविकास, महसूल असे विषयानुरूप गट पक्षाने तयार केले आहेत. नगरविकास विभागाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विषयानुसारच सदस्यांनी सभागृहात बोलावे, अशी व्यूहरचना करण्यात आली.
समन्वयाची अपेक्षा
अधिवेशनातील रणनीतीबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली.