अशोक चव्हाण यांची टीका; मोदींना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नसल्याची टिप्पणी

देशात गेल्या चार वर्षांपासून अघोषित आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पत्रकार, विचारवंत, लेखकांच्या हत्या केल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बेरोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणा यांना देशद्रोही ठरवले जात आहे. कोणी काय खायचे, कोणते कपडे घालायचे यावर नियंत्रणे आणली जात आहेत, ही अघोषित आणीबाणीच असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

देशात ४३ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीचे निमित्त करुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, देशातील  घटनात्मक संस्थाची स्वायत्तता मोडीत काढली जात आहे. न्यायव्यवस्थेवरही सरकारकडून दबाब आणला जात आहे.

एकंदरीतच आज देशात आणीबाणीची परिस्थिती असून याविरोधात जनतेत तीव्र असंतोष आहे. मात्र त्यावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी भाजपकडून आणीबाणीचा संदर्भ देऊन काळा दिवस साजरा केला जात आहे. पण मोदींच्या कार्यकाळात गेल्या चार वर्षांपासून देशातली जनता काळे दिवस भोगते आहे, त्याचे काय असा सवाल त्यांनी केला.

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी या देशातील  लोकशाही बळकट केली. त्याची फळे भाजप व मोदींना मिळत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी इंदिरा गांधी सारखा दुसरा नेता झाला नाही, अशा शब्दात त्यांची स्तुती केली होती. माजी सरसंघचालक  बाळासाहेब देवरसांसहित अटल बिहारी वाजपेयींसारख्या अनेक नेत्यांनी माफीनामा लिहून देत २० कलमी कार्यक्रमाला  पाठिंबा दिला होता, हे भाजपने विसरू नये असे भाजपचेच एक  नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.  स्वत:च्या सरकारचे गेल्या चार वर्षांतील सर्वच आघाडय़ांवरचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान  मोदी आणि भाजप काँग्रेस विरोधात अपप्रचार करित आहे, मात्र त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयावरही दबाव : न्या. अभय ठिपसे

४३ वर्षांपूर्वीच्या घटनेप्रकरणी काळा दिवस साजरा करण्यापेक्षा आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशी सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला असता, तर ते जास्त उचित ठरले असते, अशी टीका माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर केली. पूर्वीची आणीबाणी ठराविक काळासाठी होती, आज देशात अघोषित आणीबाणी आहे. सर्व संस्थांवर दबाव आणला जात आहे. न्यायालयालयावरही दबाव येत आहे, हे चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणले आहे, असे ठिपसे म्हणाले.