मराठवाडा व राज्याच्या अन्य भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीवरून सर्वसामान्य जनता आणि शेतकरी पार होरपळले असताना राज्य सरकारवर टीका करण्याकरिता काँग्रेसमध्ये नेत्यांची चढाओढच लागली आहे. माझ्या मराठवाडा दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईत दुष्काळी भागांचा दौरा केल्याचा दावाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.
काँग्रेसमध्ये गेल्या पाच दिवसांत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच विषयांवर पक्षाच्या मुख्यालयात वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून सरकारवर हल्ला चढविला. सत्तेत असो वा नसो, पक्षात आपले महत्त्व कायम ठेवण्याकरिता काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली बघायला मिळाली.
पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री जपान दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी दौऱ्याचा उपचार आटोपल्याचा आरोप राणे यांनी केला. रेल्वेने पाणी आणू, गुरांच्या छावण्या सुरू करू अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात केल्या. पण रेल्वेने पाणी आणणार कधी हे जाहीर करावे, असे सांगतानाच राणे यांनी मुख्यमंत्री फक्त थापाबाजी करतात, असा आरोप केला.
राज्यपालांची आज भेट
दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी तसेच प्रभावी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे.