शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुस्तकातून पुसण्यावर विरोधकांची टीका

मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश न करण्याबाबत राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘हेच का शिवाजी महाराजांवरील प्रेम’ असा खोचक प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी भाजप पुरस्कृत खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याचा हा कट आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्राच्या सरकारने शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास चौथीच्या अभ्यासक्रमात समावेश केला नाही हे दु:खदायक आणि संतापजनक आहे. देशाच्या इतिहासाचा विचार करता हे निंदनीय पाऊल आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले. ‘भाजप-शिवसेना सरकारचे छत्रपती शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला,’ असे ट्वीट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपचे शिवाजी महाराजांवरील प्रेम किती बेगडी आहे हे सिद्ध होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजप-शिवसेनेचे सरकार हद्दपार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. राज्यातील तमाम शिवप्रेमी आता ‘घालवू या हे सरकार’ हे एकच उद्दिष्ट समोर ठेवून काम करतील.

      – अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री