मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती आणि पक्षाचे संभाव्य उमेदवार यावर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक न लढविता नांदेड जिल्ह्य़ातून विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यावर केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपणास मान्य असेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

दादर येथील टिळक भवन या पक्षाच्या मुख्यालयात अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सांगली, पुणे, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, जालना इत्यादी काँग्रेसच्या मतदारसंघाव्यतिरिक्त अगदी बारामती, कोल्हापूर, उस्मानाबाद या मतदारसंघांतूनही मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आले होते. कोल्हापूर व नगर मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे घ्यावा, अशी जोरदार मागणीही या वेळी करण्यात आल्याचे समजते.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण झाली होती. नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव हे दोनच उमेदवार निवडून आले होते. मात्र आता अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आजच्या बैठकीत जिल्ह्य़ातील आजी, माजी आमदार, जिल्हा पषिद सदस्य, महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरला. आपण नांदेड जिल्ह्य़ातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत, मात्र यासंदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपणास मान्य असेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.