हजार कोटींच्या वर गेलेल्या संचित तोटय़ामुळे संत्रस्त झालेल्या एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर अष्टविनायक दर्शन सेवा सुरू केली आणि या सेवेला भरभरून प्रतिसादही मिळाला. संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी १८ जानेवारी रोजी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर येथून निघणाऱ्या या गाडीचे आरक्षण सुरू झाल्यानंतर चार तासांतच ही गाडी हाऊसफुल्ल झाली. एसटीने या गाडीच्या मागोमाग पाच मिनिटांनी सुटणारी आणखी एक गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या गाडीलाही अस्साच भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही वाढती मागणी विचारात घेऊन एसटी आपल्या तोटय़ाचा ‘भार’ देवावर टाकण्याची शक्यता आहे.
१८ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता निघणाऱ्या एसटीच्या ‘अष्टविनायक दर्शन’ बसचे आरक्षण १ जानेवारी रोजी सुरू होणार होते. हे आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांतच गाडी फुल्ल झाली. सेवेला मिळणारा हा प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहून एसटीने याच दिवशी ६.३० वाजता निघणाऱ्या दुसऱ्या गाडीची घोषणा केली. या गाडीचे आरक्षणही काही वेळातच फुल्ल झाले.
या दोन बसगाडय़ा फुल झाल्यानंतरही भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी १९ जानेवारी रोजी आणि २५ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता एक गाडी सिद्धिविनायक मंदिराजवळून सोडणार आहे. या बसगाडय़ा अष्टविनायक दर्शन करून अनुक्रमे २० आणि २६ जानेवारी रोजी रात्री ९.३०ला सिद्धिविनायक मंदिर येथेच परतणार आहेत. पहिल्या दिवशी पाली, महड, लेण्याद्री आणि ओझर या चार गणपतींचे दर्शन झाल्यानंतर ओझर येथील भक्ती निवासात भक्तांची राहायची सोय होऊ शकेल. मात्र ही सोय प्रवाशांनी आपापली करायची आहे. दुसऱ्या दिवशी रांजणगाव, सिद्धटेक, मोरगांव आणि थेऊर या चार गणपतींचे दर्शन घेऊन प्रवासी मुंबईकडे रवाना होतील. या प्रवासादरम्यान भोजन, अल्पोपहार आणि निवासव्यवस्था यांचा खर्च प्रवाशांनी करायचा आहे.

८५० किलोमीटरच्या या प्रवासासाठी एसटी ८३१ रुपये तिकीट आकारणार आहे. या सेवांचे आरक्षण राज्य परिवहन महामंडळाच्या http://www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असेल.