प्रशासकीय सेवेत तसेच संरक्षण दलात काम करत असताना तुमच्याकडे एक अधिकारी म्हणूनच पाहिले जाते. तिथे स्त्री-पुरुष हा भेदभाव न मानता समान संधी दिल्या जातात. या दोन्ही क्षेत्रांतील संधीचे सोने करायचे असेल तर आव्हानात्मक मनोवृत्तीनेच वाटचाल करायला हवी, असा स्पष्ट सल्ला सनदी अधिकारी अश्विनी भिडे आणि नौदल कमांडर सोनल द्रविड यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावरून मंगळवारी दिला.
बुद्धिमत्ता आणि चमकदार नेतृत्वाच्या बळावर मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अश्विनी भिडे आणि नौदलाच्या शैक्षणिक विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कमांडर द्रविड यांच्या साक्षीने ‘व्हिवा लाउंज’ या उपक्रमाचे रौप्यमहोत्सवी पर्व माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात रंगले.
लाल दिव्याचे आकर्षण असलेली प्रशासकीय सेवा आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशात चमकणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांची आव्हानात्मक कारकीर्द प्रत्यक्षात कशी असते, हे समजून घेण्यासाठी तरुण मुला-मुलींनी आणि पालकांनीही ‘केसरी’ प्रस्तुत ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने रंगलेल्या ‘व्हिवा लाउंज’ला चांगला प्रतिसाद लाभला. प्रारंभी दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दोन्ही क्षेत्रांमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करीत असताना अडचणीच जास्त असतील हा उपस्थितांच्या मनातील समज पहिल्या काही मिनिटांतच दोघींनीही मोडीत काढला. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली हे वास्तव आहे. सरकारने दिलेल्या आरक्षणासारख्या शस्त्राचा अचूक वापर करा, असा सल्ला अश्विनी भिडे यांनी दिला. तर या दोन्ही सेवांमध्ये शारीरिक क्षमतेचाच नव्हे तर मानसिक क्षमतेचाही कस लागतो, त्यामुळे या क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यातील आव्हानांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत कमांडर द्रविड यांनी व्यक्त केले.
काम करतानाचा ताण, अनियमित वेळा, बदल्या आणि स्त्री म्हणून येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्याचा समतोल साधत आपली कारकीर्द घडविणे सहज शक्य आहे, असे या दोघींनीही आपल्या अनुभवातून पटवून दिले.
प्रशासकीय आणि संरक्षण दलातील सेवेसाठी घ्यावे लागणारे शिक्षण इथपासून ते प्रत्यक्ष पदावरच्या जबाबदाऱ्यांपर्यंत प्रत्येक टप्प्यावरची आव्हाने कशी पेलावीत याविषयी दोघींनी दिलेला कानमंत्र ७ ऑगस्टच्या ‘व्हिवा’ पुरवणीत सविस्तर वाचता येईल. झी २४ तास या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहे.

महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली हे वास्तव आहे. सरकारने दिलेल्या आरक्षणासारख्या शस्त्राचा अचूक वापर करा,
-अश्विनी भिडे , सनदी अधिकारी

या दोन्ही सेवांमध्ये शारीरिक क्षमतेचाच नव्हे तर मानसिक क्षमतेचाही कस लागतो, त्यामुळे या क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यातील आव्हानांचा विचार करणे आवश्यक आहे.
– नौदल कमांडर सोनल द्रविड