नागपूर पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे;भाजपवर अंकुश ठेवण्याची खेळी

मुंबई : सत्तांतरानंतर प्रशासनात मोठय़ा प्रमाणात फेरबदल करीत गेल्याच आठवडय़ात दोन डझनहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आणखी २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले.

आरे कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवरून शिवसेनेची नाराजी ओढवून घेतलेल्या अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटविण्यात आले. मात्र, त्यांची अन्यत्र नियुक्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, कर्तव्यकठोर आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिका आयुक्तपदी शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामावर कारवाई करताना न्यायालयात सरकारविरोधात भूमिका घेतल्यावरून, नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपशी वाद झाल्याने मुंढे यांची आयुक्तपदाची कारकिर्द कमालीची वादग्रस्त ठरली होती. यातून मुंढे बदली राज्य एड्स नियंत्रण सोसायटीत प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली होती. दुय्यम पदावर नियुक्ती करून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंढे यांना अडगळीत टाकले होते. योगायोगानेच फडणवीस यांची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुक्तवाव दिल्यास मुंढे हे भाजप आणि फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

गेल्याच आठवडय़ात ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी बदली करण्यात आलेल्या राजीव जलोटा यांची पुन्हा बदली करण्यात आली. जलोटा ग्रामविकास विभागात जाण्यास इच्छुक नव्हते. ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्यसचिवपदी अरविंद कुमार यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महापारेषण  कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर पराग जैन यांची सामाजिक न्याय विभागात बदली करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव म्हणून राजीव जाधव यांची तर मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून प्राजक्ता लवंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेखर गायकवाड यांची पुणे महापालिका आयुक्तपदी तर ए.एम. कवडे यांची सहकार आयुक्तपदी, सौरभ राव यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कांतीलाल उमाप यांची उत्पादनशुल्क आयुक्तपदी, राजीव निवतकर यांची मुंबई जिल्हाधिकारी म्हणून, आयुष प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडच्या उभारणीसाठी आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीमुळे  भिडे यांनी शिवसेनेची नाराजी ओढवून घेतली होती.
  • मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच ठाकरे यांनी आरे कारशेड उभारणीच्या कामाला स्थगिती देऊन पर्यायी जागेच्या शोधासाठी समितीही नेमली आहे.
  • भिडे यांच्या जागी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिकेच्या आयुक्तपदी बदली करून महाविकास आघाडीने भाजपवर कुरघोडी केल्याचे मानले जाते.
  • पालिकेतील सत्ताधारी भाजपवर अंकुश ठेवण्याबरोबरच दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुका डोळयासमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जाते.