मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली असून अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पालिकेचेही आभार मानले आहेत.

अश्विनी भिडे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आणखी एक संधी दिल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे आभार. संपूर्ण निष्ठेने आणि दृढ निश्चयानं पालिकेच्या टीमसोबत करोनाचं हे युद्ध लढण्यास सज्ज आहोत,” असं त्या म्हणाल्या.

अश्विनी भिडे सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही अश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन जानेवारी महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस करोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी देण्यात आली होती.