राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचा पदभार काढून घेतला मात्र दुसरीकडे कुठेही नियुक्ती केली नाही. या निर्णयावरून भिडे यांना मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवल्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली. अखेर अश्विनी भिडे यांनी एक ट्विट करून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.

चार दिवसांपूर्वी राज्यातील २० प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना पदावरून दूर करण्यात आलं. त्यांच्या जागेवर राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली. मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडच्या उभारणीसाठी आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीमुळे भिडे यांनी शिवसेनेची नाराजी ओढवून घेतली होती. अश्विनी भिडे यांना पदावरून दूर केल्यानंतर ही वृक्षतोडच या निर्णयामागे आहे का अशी चर्चा रंगली आहे.

पदावरून दूर केल्यानंतर अश्विनी भिडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांनी पहिल्यांदाच ट्विट करून बदलीविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचं ट्विट रिट्विट करून अश्विनी भिडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

“आपण आपले काम व्यावसायिकरीत्या आणि अतिशय मन लावून करतो. मात्र त्याकडे वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या नजरेनं बघतात, यावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात नसतं. जी लोकं त्या त्या क्षेत्रात काम करतात त्यांनाच समजू शकतं की काय झालंय नी काय करायला हवंय. बाकी सर्व ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत राहणं,” असं म्हणत अश्विनी भिडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.