मुंबईत उपनगरीय रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेने भारत सरकारला ५०० दशलक्ष डाॅलर्सचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.

विरार-डहाणू रेल्वे कॉरिडोअर,  पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग तसेच अन्य उपनगरीय रेल्वेच्या कामासाठी  या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. मुंबईत लोकसंख्या आणि शहरीकरण वेगाने वाढत असून त्या दृष्टीने रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यासाठी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेने हे कर्ज मंजूर केले आहे.

मुंबईत रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. हे अपघात रोखण्यासाठी उपायोजना करण्यात येणार आहेत. यात रेल्वे मार्गाभोवती कुंपण उभारणीसाठी संरक्षक भिंत उभारण्यासारख्या उपायोजनांचा समावेश आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्ग ४०० किलोमीटरपर्यंत विस्तारलेला असून दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. मुंबईत रेल्वे प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन आहे.

मागच्या चार वर्षात एआयआयबीची भारतातील गुंतवणूक मोठया प्रमाणावर वाढली आहे असे बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी डी.जे.पांडीयन यांनी सांगितले. २०२५ पर्यंत प्रतिवर्षी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची एआयआयबीची योजना आहे. ऑक्टोंबर महिन्यात एआयआयबी बँकेने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रासाठी टाटा क्लीनटेक कॅपिटल लिमिटेडला ७५ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले. एआयआयबीने आतापर्यंत वाहतूक, ऊर्जा, पाणी आणि वित्त क्षेत्रासंबंधीच्या १३ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.