मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. शासकीय अनुदान वेळेवर मिळूनही पगार देण्यात व्यवस्थापन चालढकल करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ऐतिहासिक वास्तू आणि अडीच लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असलेल्या एशियाटिक सोसायटीतील कर्मचारी पुस्तकांच्या देखभालीसाठी कायम झटत असतात. परंतु करोनाच्या कठीण काळात सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांचा पगार दिला गेलेला नाही. मे महिन्याचा पगार न मिळाल्याने कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला; परंतु त्याला कोणतीही दाद मिळाली नाही. संबंधित कर्मचारी सध्या आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. घरखर्च, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांना कर्मचारी तोंड देत आहेत.

‘ग्रंथालयाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने विविध स्तरातून आर्थिक मदत मिळत असते. ही रक्कम वार्षिक स्वरूपात अंदाजे अडीच कोटी रुपये इतकी आहे. शिवाय इतर अनुदान आणि अर्थसाहाय्य सुरू असताना संस्थेला पगार देण्यात काय अडचणी आहेत, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. सोसायटीला मिळणारे अनुदान, शिल्लक रक्कम, होणारा खर्च याचा आर्थिक अहवाल व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांपुढे खुला करावा. शिवाय शिल्लक रकमेचे नियोजन आणि येत्या १० वर्षांतील ध्येयधोरणे याबाबतही व्यवस्थापनाने चर्चा करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

कर्मचाऱ्यांच्या नियोजित पगारात २०१६ ला ४० टक्के कपात करण्यात आली. २०१९ ला त्यांना मिळणारा भत्ताही पगारातून वगळण्यात आला. त्यामुळे आधीच तुटपुंजा वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने द्यावेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

एशियाटिक सोसायटीचे कामकाज धर्मादाय आयुक्तांच्या नियमावलीप्रमाणे चालते. टाळेबंदीमुळे संस्थेला मिळणारा निधी रखडला. तरीही मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पूर्ण पगार कर्मचाऱ्यांना दिले. परंतु निधीअभावी मे महिन्यात पगार देणे शक्य झाले नाही. कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असली तरी आम्हीही निधीच्या प्रतीक्षेत आहोत.

– सुरेंद्र कुलकर्णी, सचिव, एशियाटिक सोसायटी