महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मोठा सामाजिक बदल होईल. तसेच मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमध्ये असलेला संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पदुममंत्री महादेव जानकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे आदी या वेळी उपस्थित होते.

अस्मिता योजनेमुळे एकही मुलगी सॅनिटरी पॅडपासून वंचित राहणार नाही. तसेच कोणीही या योजनेचा दुरुपयोग करू शकणार नाही. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांतिकारी ठरावी अशी अस्मिता योजना ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील महिलांना एक चांगली योजना दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले. लोकांनी अस्मिता फंडसाठी मदत करून जास्तीत जास्त मुलींसाठी अस्मिता प्रायोजकत्त्व स्वीकारावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

साधारण फक्त सव्वाशे कोटी रुपये जमा झाले तरी आपण संपूर्ण महाराष्ट्राला १०० टक्के पॅडचा वापर करणारे राज्य बनवू शकतो. त्यामुळे सर्वानी अस्मिता फंडासाठी सहयोग करावा, असे आवाहन अक्षयकुमार यांनी केले. या वेळी त्यांनी १० हजार मुलींचे प्रायोजकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले. मंत्री महादेव जानकर यांनीही या वेळी ५१ मुलींचे प्रायोजकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

अस्मिता योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढेल, महिलांचे आरोग्य सुधारेल, बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळेल. त्यामुळे ही योजना महिलांच्या आरोग्यरक्षणाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवणारी योजना आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.