मुंबई : मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदाराची हत्या करणाऱ्या तरुणास ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. पैशांची निकड असूनही कंत्राटदाराने तीन महिने मजुरी थकवली आणि मजुरी वाटपात प्रांतवाद सुरू केल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे आरोपी तरुणाने पोलिसांना सांगितले.

कंत्राटदार शब्बीर आलम शेख ८ जूनला लोअर परळ येथील ‘शहा अ‍ॅण्ड नाहर औद्योगिक संकुला’च्या इमारतीवरून खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान अपघातापूर्वी शब्बीर आणि साहेब शेख या मजुरामध्ये वाद सुरू होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. शेख हा थकलेल्या मजुरीवरून शब्बीर यांच्याशी वाद घालत होता. दोघांमध्ये हाणामारी झाली होती हे पाहिलेला साक्षीदार पोलिसांना चौकशी करताना मिळाला. तो दुवा पकडून पोलिसांनी साहेबची शोधाशोध सुरू केली.

साहेब ८ जूनपासून बेपत्ता होता. त्याचा मोबाइलही बंद होता. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप भोसले यांनी साहेबच्या शोधार्थ दोन पथके  तयार केली. साहेब पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाली. हे पथक प. बंगाल येथे रवाना झाले. या पथकाने निव्वळ खबऱ्यांच्या जोरावर साहेबला मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अटक केली.

गावी मुलगा आजारी होता. त्याच्या उपचारांसाठी पैशांची गरज होती. म्हणून थकलेली मजुरी मागितली असता शब्बीर यांनी एक हजार रुपये हाती ठेवले. त्यावरून वाद झाला आणि हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.