विनायक परब

कणकवलीपासून २२ किमी. अंतरावर असलेल्या कोळोशीच्या गुहेत अलीकडेच केलेल्या उत्खननामध्ये सापडलेली अश्महत्यारे इसवीसन पूर्व ३० हजार वर्षे जुनी असावीत, असा प्राथमिक अंदाज पुराविदांनी व्यक्त केला आहे.

इसवी सनपूर्व ८० हजार वर्षांपूर्वीच्या अश्युलीयन अश्महत्यारांनंतर थेट इसवी सनपूर्व दोन हजार वर्षांपूर्वीचेच मानवी अस्तित्वाचे पुरावे कोकणात आजवर सापडले होते. मात्र या दरम्यानच्या काळात नेमके  काय घडले, त्या कालखंडात कोकणात माणसाचे वास्तव्य होते का, हा आजवर यक्षप्रश्नच राहिला. आता मात्र या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.

कोकणात सुरसोंडी येथे १९९९ साली पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. अशोक मराठे यांना सापडलेल्या इसवी सनपूर्व ८० हजार वर्षे जुन्या अश्महत्याराशिवाय इतर कोणतेही ठोस पुरावे आजवर सापडले नव्हते. मात्र गेल्या वीस वर्षांमध्ये कोकणातील संशोधकांनी अनेक कातळशिल्पे उघडकीस आणली आणि कातळशिल्पांचा शोध मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. २०१४ साली कोळोशी ग्रामस्थांनी पुरातत्त्व संचालनालयास नाथपंथीयांच्या गुहेची माहिती कळविली. संचालनालयातील संशोधक ऋत्विज आपटे आणि सहाय्यक संचालक डॉ. भा. वि. कुलकर्णी यांनी या गुहेस भेट दिली. त्यावेळेस ही नैसर्गिक गुहा असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, २०१७ साली कशेळी येथे गवेषणादरम्यान पुन्हा एकदा नैसर्गिक गुहा आणि कातळशिल्पांच्या आसपास सापडणाऱ्या अश्महत्यारांची चर्चा झाली. त्यावेळेस डॉ. कुलकर्णी यांनी कोळोशीचा पुन्हा एकदा उल्लेख केला. निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व स्वत आपटे यांनी २०१८ साली सप्टेंबरमध्ये पावसातच या गुहेला भेट दिली. त्यावेळेस तेथे येणाऱ्या वाटेवरच मोठय़ा प्रमाणावर अश्मयुगीन हत्यारे सापडली. त्यानंतर तातडीने भारतीय पुरातत्त्व खात्याची परवानगी घेऊन गेल्या वर्षी प्रथम कोळोशी येथे उत्खनन करण्यात आले. येथे सापडलेल्या अश्महत्यारांनंतर हे स्थळ मध्याश्म कालखंडातील आहे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र गेल्या वर्षी अश्मयुगातील विविध कालखंडातील हत्यारे गुहेला पडलेल्या भगदाडाखाली एकत्र सापडल्याने यंदा नव्याने उत्खनन करून मातीच्या नेमक्या कोणत्या थरात, कोणत्या प्रकारची हत्यारे सापडतात त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी सुमारे दीड हजारांहून अधिक सूक्ष्मअश्महत्यारे सापडली. यात मध्यम अश्महत्यारापासून ते उत्तर अश्मयुगातील ब्लेड्सपर्यंत अनेक हत्यारांचा समावेश होता. ऋत्विज आपटे म्हणतात, यंदा या गुहेपासून पाच किमी. परिसरात गवेषण करण्यात आले. यातही जमिनीवरच उत्तर अश्मयुगीन तसेच मध्याश्मयुगीन हत्यारे सापडली.

कालगणनेसाठी तज्ज्ञांची मदत..

कोळोशीच्या उत्खननाचे व राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे ‘लोकसत्ता’ला माहिती देताना म्हणाले की, कोळोशी येथे सापडलेली अश्महत्यारे इसवी सनपूर्व ३० हजार वर्षे जुनी म्हणजेच उत्तर अश्मयुगीन असावीत, असा प्राथमिक अंदाज असून नेमक्या कालगणनेसाठी ती आता मोहाली येथील आयसरमधील तज्ज्ञांकडे पाठविण्यात येतील. कातळशिल्पांच्या शोधापासून सुरू झालेल्या या प्रवासाने आता त्यांच्या आजूबाजूला सापडलेल्या अश्महत्यारांमुळे कोकणातील अंधारात राहिलेल्या हजारो वर्षांच्या कालखंडावर प्रकाश टाकण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आता इसवी सनपूर्व ८० हजारनंतरचा इसवी सनपूर्व ३० हजार असा दुवा हाती लागला आहे. हा महत्त्वपूर्ण शोध ठरावा.