शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले तेव्हापासूनच देशभरात मोदी नामाचा जयघोष सुरू झाला. हाच जयघोष ट्विटरवरही दिसून आला. दिवसभरात जगभरातून भाजपच्या नावाने लाखो ट्वीट्स आलेत. यात नरेंद्र मोदी @narendramodi या ट्विटर खात्याचा उल्लेख करून किंवा या ट्विटर खात्यावरून सकाळपासून तब्बल दोन लाख ८८ हजार ट्वीट्स आलेत. यापैकी एक लाख ९९ हजार ४०० रीट्वीट आहेत. ६३ हजार ८०० ट्वीट उत्तरादाखल दिलेले आहेत. या ट्वीटर खात्याचा वापर करणाऱ्यांमध्ये २० टक्के महिला तर ८० टक्के पुरुष वापरकर्ते होते.

सकाळी ५.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या ट्वीट्सचे प्रमाण निकालाच्या वेळेनुसार वाढू लागले. दुपारी एकच्या सुमारास ही संख्या इतकी वाढली की त्या वेळात प्रत्येक मिनिटाला सुमारे ३५०० ट्वीट्स करण्यात आले. मोदी यांनी केलेल्या ट्वीटपैकी दुपारी १२ वाजून ९ मिनिटांनी केलेल्या India has won! भारत का विजय। अच्छे दिन आनेवाले है।’ या ट्वीटला सर्वाधिक ९२ हजार ७०२ रीट्वीट्स मिळाले होते. तर ६५ हजार २११ जणांना हे ट्वीट लाइक केले होते. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर खात्याचा वापर करून पाकिस्तानातून तब्बल ४८० ट्वीट्स झाले आहेत. यातील ३६० रीट्वीट्स होते तर ६५ ट्वीट्सना उत्तर होते. हे ट्वीट करणाऱ्यांमध्ये ३९ टक्के महिला आणि ६१ टक्के पुरुषांचा समावेश होता. तर अमेरिकेतून या ट्विटर खात्याचा उल्लेख करून तब्बल ७९०० ट्वीट्स करण्यात आले. ब्रिटनमधून २२०० ट्वीट्स करण्यात आले. या ट्विटर खात्यावर सर्वाधिक ट्विटरचर्चा भारतात रंगली. त्या खालोखाल सिंगापूर, ओमन, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशांत या खात्याचा उल्लेख करून ट्वीटचर्चा रंगली. नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक खात्याबरोबरच भाजपचा उल्लेख करून जगभरातून तब्बल तीन लाख ४० हजार ट्वीट्स झाल्याचा तपशील ट्रेंड्समॅप या संकेतस्थळावरून उपलब्ध झाला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत सर्वच पक्षांना साथ देणाऱ्या ट्विटरवरील #upelection2017 या हॅशटॅगचा वापर करून दिवसभरात तब्बल ६५१०० ट्वीट्स करण्यात आले. याचबरोबर @bjp4india या खात्यावरून किंवा या खात्याचा उल्लेख करून दिवसभरात ७३ हजार ट्वीट करण्यात आले. याशिवाय भाजपशी संबंधित इतर अनेक हॅशटॅग आणि खात्यांचा वापर करून दिवसभरात लाखो ट्वीट्स झाले आहेत.