विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरचा दिवस जाहीर होताच राज्यभरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या कपाळावर आठी चढली. या तारखेमुळे याच कालावधीत नियोजित असलेल्या सत्र परीक्षांबरोबरच दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची चांगलीच फरफट होणार आहे.
ऑक्टोबर हा परीक्षांचा महिना असून या महिन्यात सर्व शाळांमध्ये सहामाही परीक्षांबरोबरच दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षाही असतात. मतदानाच्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी बारावीच्या दोन परीक्षा असून या परीक्षा आता पुढे ढकलाव्या लागणार आहेत. तर ऐन परीक्षांच्या काळात निवडणुकांची कामे सांभाळताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
या संदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी. के. मम्हाणे यांनी १५ ऑक्टोबरच्या परीक्षेची तारीख बदलावी लागेल. सोमवारी याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळात बारावीची शिक्षणशास्त्र विषयाची तर दुपारी २.३० ते ५.३० याच वेळेत इंग्रजी साहित्य या विषयाची परीक्षा आहे.

आता रविवारीही वर्ग भरणार
अचानक लांबलेली गणपतीची सुट्टी आणि इतर सुट्टय़ांमुळे यंदा सहामाही परीक्षांच्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. यामुळे हा अभ्यासक्रम सप्टेंबर अखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. यासाठी काही शाळांनी तर शनिवार रविवारची सुट्टीही रद्द केली आहे. शाळांना प्रत्येक सत्राला ठरावीक शैक्षणिक तास पूर्ण करणे बंधनकारक असते. हे शैक्षणिक तास अचानक वाढलेल्या गणपतीच्या सुट्टय़ांमुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ातही सलग चार दिवस सुट्टी आली आहे. त्यातच निवडणुका जाहीर झाल्यामुळे शिक्षकांना निवडणुकांचीही कामे लागणार असल्याने शैक्षणिक तास कसे पूर्ण होतील अशी चिंता शाळांना आहे. शाळांनी सहामाही परीक्षा ६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान नियोजित केल्या आहेत. या आधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वर्ग आता रविवारीही भरविण्यात येणार असल्याचे शिक्षक डेमोक्रेटीक फंट्रचे सचिव राजेश पंडय़ा यांनी सांगितले.
एक नव्हे दोन दिवसांचा प्रश्न
निवडणुकांचे काम एकाच दिवशी होत नाही. केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालये मतदानाच्या आधीचा दिवस व नंतरचा एक दिवस निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात. यामुळे त्या दोन दिवसांच्या परीक्षांचाही प्रश्न आहे.
– उदय नरे, हंसराज मोराजी पब्लिक स्कूल

शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे
निवडणुकांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांना नेमकी कोणती कामे करावी लागतील याचा अंदाज नाही. पण काही कामांसाठी शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जावे लागते. परिणामी शिक्षकांना शिकवण्यास वेळच मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळावे.
– प्रशांत रेडीज, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ

अन्य पेपरही बदलणार
मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात १५ ऑक्टोबर रोजी परीक्षा नसल्या तरी १४ व १६ ऑक्टोबरच्या २५ परीक्षांच्या तारखा बदलण्यात येतील.
– लीलाधर बनसोड,  प्रवक्ते मुंबई विद्यापीठ