देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक शस्त्रे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंगळवारी सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.


राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली या भागात हिंसाचार घडवून आणणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांचा सामना करताना राज्याच्या सुरक्षा रक्षकांना बऱ्याचदा कालबाह्य आणि अपुऱ्या शस्त्रांअभावी अनेक अडचणी येतात. याचा विचार करता नक्षलग्रस्त भागात तैनात असणाऱ्या जवानांना अत्याधुनिक शस्त्रे, साधनं आणि तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी तसेच इथल्या तरुणांमध्ये रोजगार क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विशेष स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी ५०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.