News Flash

पालिकेच्या आठ अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

आयुक्त इक्बालसिंग चहल यांचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचा मुकाबला सुनियोजित पद्धतीने करावा याकरिता नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सर्व आठ आयएएस अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्तांना पुढील आदेश मिळेपर्यंत या जबाबदाऱ्यांवर काम करावे लागणार आहे. तर सीएसआरमधून निधी जमा करण्याची जबाबदारी देखील यात देण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ात पालिकेत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले. नवनियुक्त आयुक्त चहल यांच्याबरोबरच अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

करोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सध्या पालिकेत सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, संजय जयस्वाल, पी. वेलारसू असे चार अतिरिक्त आयुक्त, आशुतोष सलील हे सहआयुक्त आणि मनीषा म्हैसकर, प्राजक्ता लवंगारे आणि डॉ. एन. रामस्वामी असे तीन विशेष कार्य अधिकारी आहेत. या आठ अधिकाऱ्यांना नुकतेच जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

मनीषा म्हैसकर

यांच्याकडे कोविड आजारासाठी पालिका रुग्णालयात असलेल्या खाटांच्या नियोजनाची जबाबदारी असेल. करोना काळजी केंद्र आणि रुग्णालयातील सेवा अधिक चांगल्या करण्यावर त्यांचे लक्ष असेल.

अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, पूर्व उपनगरे

करोना आजाराशी लढण्याची एकूणच कार्यपद्धती ठरवणे, रुग्णांचा संपर्क शोध, प्रतिबंधित विभागाचे व्यवस्थापन, संस्थात्मक विलगीकरण केंद्र, तसेच करोना काळजी केंद्र तयार करणे.

संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त, शहर

अन्न आणि धान्यपुरवठा व वितरण, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय, प्रतिबंधित क्षेत्रात धान्यपुरवठा, टाळेबंदी शिथिल करण्याबाबत धोरण ठरवणे, परप्रांतीय कामगारांना आपापल्या राज्यात पाठवण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे.

प्राजक्ता लवंगारे-वर्मा

कोविड योद्धा योजनेत समन्वय करणे, पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांच्या नेमणुका करणे, सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण.

पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)

मान्सूनपूर्व कामांची पूर्तता, नालेसफाई, उदंचन केंद्र, परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी, त्यांच्या विलगीकरणाची सोय, कोविडसाठी लागणाऱ्या सगळ्या वैद्यकीय साधनांच्या पूर्ततेसाठी समन्वय.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पश्चिम उपनगरे

पालिकेची मुख्य रुग्णालये, उपनगरी रुग्णालये आणि दवाखाने यांचे व्यवस्थापन, वैद्यकीय महाविद्यालयांचे व्यवस्थापन, चाचण्यांची नियमावली पालन, करोना रुग्णांना घरी पाठवण्याबाबत नियमावलीची अंमलबजावणी, आरोग्य विभागाचे एकूण प्रशासन.

डॉ. एन. रामस्वामी

सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता १३०० खाटांपर्यंत वाढवणे, त्याकरिता कर्मचारी प्रशिक्षित करणे, डायलिसिससारख्या सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञांच्या नेमणुका करणे.

आशुतोष सलील, सहआयुक्त

करोना काळजी केंद्र २ आणि ३ ची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करणे, अशा सुविधांची इत्थंभूत माहिती ठेवणे, कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी तत्त्वावर आर्थिक मदत मिळवण्यासाठी समन्वय, करोनाशी संबधित संपूर्ण आकडेवारीचे व्यवस्थापन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:54 am

Web Title: assignment of responsibilities to eight officers of the municipality abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ४२६ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू
2 रुग्णालयांतील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस
3 श्रमिकांच्या मोफत प्रवासाची फक्त घोषणाच
Just Now!
X