मुंबई : वकील महिलेकडून आठ वर्षांपूर्वी पाच लाखाची लाच घेतल्याप्रकरणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल शिंगणे (५५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एसीबी) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

एका विश्वस्त मंडळाशी या वकील महिलेचा जागेबाबतचा वाद होता. याप्रकरणी तिच्या बाजूने निर्णय देण्यासाठी शिंगणे यांनी २०१०मध्ये पाच लाख रुपयांची लाच घेतली होती. लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारल्याचे पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आले आहे, असे नमूद करत न्यायालयाने शिंगणे यांना दोषी ठरवले आणि तीन वर्षांचा कारावास ठोठावला. तसेच एक हजाराचा दंडही ठोठावला.

न्यायालयीन प्रथम वर्ग महानगर दंडाधिकारी  म्हणून काम पाहिल्यानंतर पुणे येथे साहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २००६ ते २००९ या कालावधीत ते तेथे साहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून कार्यरत होते. याच काळात तक्रारदार वकील महिला धर्मादाय आयुक्तालयामध्ये पोहोचली. तिला ११ एकर जागेबाबतच्या नोंदीमध्ये बदल करून हवा होता. ही जागा विकण्याबाबत तिच्यात आणि संबंधित विश्वस्त मंडळामध्ये करार झाला होता. मात्र विक्रीचा हा करार पूर्ण होण्याआधीच या जागेवर मंडळाचे कार्यालय म्हणून नोंद झाली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेला जागेच्या नोंदीत बदल करून हवा होता. परंतु याप्रकरणी बाजूने निर्णय देण्यासाठी शिंगणे यांनी आपल्याकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला होता.

याच दरम्यान शिंगणे यांची मुंबईला बदली झाली. त्यामुळे त्यावेळी त्यांना लाचेची रक्कम दिली गेली नाही. परंतु नंतर त्यांनी तक्रारदार महिलेशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त तसेच दिवाणी न्यायाधीशांची नावे पुढे करत त्यांनी तिच्याकडे पाच कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबदल्यात तिच्या बाजूने निर्णय लागेल याची हमी शिंगणे यांनी तिला दिली. नंतर िशगणे यांनी लाचेची रक्कम पाच कोटींवरून पाच लाख रुपये केली होती.