देवनार कचराभूमीतील आगीनंतर पालिकेचा निर्णय

देवनार कचराभूमीतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग टीकेचे लक्ष्य झाला होता. त्यामुळे आता स्वतंत्र सहाय्यक आयुक्ताची नेमणूक करुन हा विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कामाची विभागणी होऊन कचऱ्याच्या व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवण्यात पालिकेला यश येईल.

देवनार करचाभूमीतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. तसेच धुमसणाऱ्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरण आणि आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार उपायुक्त आणि प्रमुख अभियंता यांच्यावर आहे. त्यामुळे या विभागासाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्त पद निर्माण करुन कामाची विभागणी करीत हा विभाग अधिक कार्यक्षम करण्यावर प्रशासनाचा कल आहे.

पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये आणि अन्य काही विभागांमध्ये असे मिळून एकूण ३० सहाय्यक आयुक्त पालिकेत कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयुगाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तांची पदे भरण्यात येतात. आता घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी सहाय्यक आयुक्त पद निर्माण करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक आयुक्तांकडे प्रशासकीय व अन्य काही जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. उपायुक्त, प्रमुख अभियंता आणि मुख्य पर्यवेक्षक यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून सहाय्यक आयुक्ताला भूमिका पार पाडावी लागणार आहे. या पदावर व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन, शहर) हे पद सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग)मध्ये रुपांतरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.