रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या नाटय़कृतींचे वेगळ्या आयामातून पुनर्लेखन करत त्या कलाकृतींना नवचैतन्य प्राप्त करून देणारा ‘त्या दरम्यान’ हा आगळावेगळा नाटय़लेखन प्रयोग ‘अस्तित्व’ या संस्थेकडून राबविण्यात येत आहे. येत्या जानेवारी महिन्यात खारदांडा येथील ‘हाइव्ह’ या सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात होणार असून वर्षभरात महिन्याला एक अशा किमान बारा संहिता सादर केल्या जाणार आहेत.
नाटकाच्या संहितेत प्रेक्षकाला नव्या शक्यता, वेगळा अन्वयार्थ जाणवत असतो. संहितेमधील प्रसंगांच्या आड जेव्हा पात्रं असतात तेव्हा काय घडत असेल, नाटकातल्या प्रसंगांची वेगळी बाजूही असू शकल्यास ती काय असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत असतात. बहुतांशवेळा प्रेक्षक आपल्या कल्पनाशक्तीने नाटकाचे वेगळे अन्वयार्थ शोधत असतात. आता हे सर्व ‘त्या दरम्यान’मधून नव्या संहितांच्या स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. याविषयी अस्तित्वचे रवी मिश्रा म्हणाले की, ‘आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची परंपरा आहे, परंतु त्या दरम्यान काय घडले असेल याचा स्वतंत्र नाटय़कृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न ठरवून घडावा व नवे काही हाती लागावे म्हणून ‘त्या दरम्यान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.’
यात मूळ नाटय़कृतीच्या संदर्भ व घटनांशी प्रामाणिक राहून समांतर नाटय़कृती लिहिली जाणार आहे. अजरामर नाटके किंवा एकांकिकांच्या त्या दरम्यानचा शोध व्यापक स्तरावर करण्याचा विचार असून अशा प्रकारचे लेखन केलेल्या लेखकांनी संहिता ‘अस्तित्व’कडे पाठवाव्यात, असेही ते म्हणाले. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२१०४४८६२.