निकाल अंदाजावरून ज्योतिषांची माघार

मुंबई : निवडणूक निकालाचे अचूक भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या एकाही तथाकथित ज्योतिषाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) आव्हान स्वीकारले नाही. त्यामुळे फलज्योतिष हे एक थोतांड असून, त्यांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन अंनिसने केले आहे.

फलज्योतिष हे शास्त्र नाही, तर भोळ्याभाबडय़ा लोकांना फसवण्याचा धंदा आहे, अशी भूमिका अंनिसने कायम घेतली आहे. फलज्योतिषांचे थोतांड उघडे पाडण्यासाठी गेल्या वर्षांपासून विविध निवडणुकांचे निकाल अचूकपणे सांगण्याचे आव्हान तथाकथित ज्योतिषांना करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत एकाही ज्योतिषाने अंनिसचे हे आव्हान स्वीकारलेले नाही, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

अंनिसच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे अचूक निकाल सांगा आणि २१ लाख रुपये जिंका, असे आव्हान ज्योतिषांना दिले होते. अंनिसने त्यासाठी एक प्रश्नपत्रिका तयार केली होती. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांनी एक हजार रुपये भरून नोंदणी करायची होती.  प्रतीक्षा करून अंनिसच्या वतीने २५ ज्योतिषांना रजिस्टर्ड टपालाने त्यांच्या निवासी पत्त्यांवर या प्रश्नपत्रिका व प्रवेशिका पाठविल्या होत्या तरीही कुणी आमचे आव्हान स्वीकारले नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली.