‘स्मृतिभ्रंश’ (अल्झायमर्स) या आजाराभोवती गुंफलेली कथा, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मिळालेले मानाचे पुरस्कार, दोन राष्ट्रीय पुरस्कार असा सगळा लौकिक मिळवूनही वितरकांअभावी रखडलेल्या ‘अस्तु’ या मराठी चित्रपटाने लोकनिधीचा (क्राऊड फं डिंग)आधार घेतला आहे. मोहन आगाशे यांची मुख्य भूमिका असलेला ‘अस्तु’ हा चित्रपट गेली दोन वर्ष आर्थिक चणचणीमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. अखेर, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्या शीला राव यांनी ‘लोकनिधी’चा पर्याय निवडला असून मराठीत पहिल्यांदाच असा प्रयत्न केला जात आहे.
‘अस्तु’ हा चित्रपट खरेतर लघुपट म्हणून बनवण्यात येणार होता. त्यासाठी मुख्य अभिनेता म्हणून मोहन आगाशे यांना पटकथा ऐकवल्यानंतर इतक्या चांगल्या विषयावर चित्रपटच व्हायला हवा, अशी सूचना आगाशेंनी केली. मग त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले, अशी माहिती शीला राव यांनी दिली. चित्रपटाच्या पटकथा-दिग्दर्शनाची जबाबदारी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र लघुपट ते चित्रपट या प्रवासात चित्रपटाचे बजेट वाढतच गेले. या चित्रपटासाठी सहनिर्माता म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली होती, त्यांनीही ऐनवेळी माघार घेतल्याने चित्रपटापुढच्या आर्थिक अडचणी वाढतच गेल्या. खुद्द मोहन आगाशे यांनी सहनिर्मिती करून चित्रपट पूर्ण केला. मात्र प्रदर्शनासाठी वितरक न मिळाल्याने हा चित्रपट दोन वर्ष अडकून पडला असल्याची माहिती शीला राव यांनी दिली.चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांना अजून ४५ लाख रुपयांची गरज आहे. यासाठी त्यांनी लोकनिधीतून पैसा उभा करण्याचा निर्णय घेतला असून याआधी असा प्रयत्न हिंदीत दिग्दर्शक रजत कपूर यांनी आपल्या ‘भेजा फ्राय’ या चित्रपटासाठी केला होता. त्यानंतर ‘ल्युसिया’ हा कन्नड चित्रपटही अशाच पद्धतीने लोकांकडून पैसे गोळा करून पूर्ण करण्यात आला.