चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीचा नवा विक्रम; सेकंदाला १८ तिकिटांची विक्री

आयर्न मॅन, स्पायडर मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका अशा एकाहून एक सुपरहिरोंचा भरणा असलेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ हा हॉलीवूडपट भारतातील तिकीटबारीवरील सर्व विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने निघाला आहे. आज, शुक्रवारी देशभर प्रसिद्ध होत असलेल्या या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीला आठवडाभर आधीच सुरुवात झाली असून प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये दर सेकंदाला १८ या वेगाने या चित्रपटाची तिकीटविक्री होत आहेत. ‘बुक माय शो’ या संकेतस्थळ/ अ‍ॅपवर तर अवघ्या एका दिवसात या चित्रपटाच्या दहा लाख तिकिटांची विक्री झाली आहे.

तिकिटांच्या आगाऊ विक्रीबाबत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ने ‘बाहुबली-२’ च्या प्रदर्शनपूर्व तिकीटविक्रीचा आकडा मागे टाकला आहे. ‘बाहुबली-१’च्या यशाच्या आणि त्यातील रहस्याच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या ‘बाहुबली-२’च्या प्रदर्शनापूर्वीच ३१.५० कोटी रुपयांची तिकीटविक्री झाली होती. मात्र, ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या नव्या चित्रपटाची आगाऊ तिकीटविक्री आताच ३५ कोटींच्या पार पोहोचली आहे. ‘बाहुबली-२’खालोखाल असलेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्ताँ’(२७.५० कोटी) आणि ‘टायगर जिंदा है’ (२५ कोटी) यांना ‘अ‍ॅव्हेंजर्स’ने तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच मागे टाकले आहे.

दिल्ली आणि मुंबईत या चित्रपटाला सर्वाधिक मागणी आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवस आधीच हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. बुकिंगच्या बाबतीत येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल ३२ सुपरहिरो असलेल्या या चित्रपटात निर्मात्यांनी एक हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. याआधीच्या ‘अ‍ॅव्हेन्जर्स – इन्फिनिटी वॉर’मध्ये खलनायक थेनॉसने पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे अ‍ॅव्हेन्जर्सची उरलेली टीम शक्तिशाली झालेल्या थॅनॉसला कसे सामोरे जाते, हे ‘एंडगेम’मधून समोर येणार आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेममुळे अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे सगळे विक्रम मोडले आहेत. पूर्ण भारतभरामध्ये हीच परिस्थिती आहे. इतिहासात पहिल्यांदा असे घडत आहे. हिंदी चित्रपटांचेही एवढे बुकिंग होत नाही.

याआधी ‘बाहुबली २ – द कन्क्लूजन’ या चित्रपटाने बुकिंगचा विक्रम केला होता. आयनॉक्समध्ये हा विकेंड हाऊसफुल्ल आहे. आता पुढच्या आठवडय़ाचे बुकिंग सुरू झाले आहे, असे आयनॉक्सचे चीफ प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंग यांनी सांगितले.

देशी चित्रपटांना फटका?

या चित्रपटाचे शंभरहून अधिक शहरांत दररोज एक हजारपेक्षा अधिक शो होणार आहेत. चित्रपटगृहांना या चित्रपटाची लांबी (१८१ मिनिटे) जास्त असल्यामुळे अधिक शो ठेवणे शक्य होत नाही आहे. दुसऱ्या चित्रपटांना हटवून या चित्रपटासाठी जागा निर्माण केली जाऊ शक ते. पण त्या संबंधित चित्रपटनिर्मात्यांशी झालेल्या कराराचे ते उल्लंघन ठरेल. सध्या कलंक, रोमियो अकबर वॉल्टर, द ताश्कंद फाइल्स हे बॉलीवूडपट चित्रपटगृहात आहे. या आठवडय़ात हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे निर्मार्त्यांनी टाळले आहे. मराठीमध्ये ‘मिरांडा हाऊस’, ‘वेडिंगचा शिनेमा’ हे चित्रपटगृहात असून ‘कागर’ हा चित्रपट २६ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटांच्या वाटय़ाला कमी स्क्रीन्स आल्यामुळे त्याचा फटका बसू शकतो.