शवागारातील त्या खोलीत एका मृतदेहाची चिरफाड सुरू होती.. अपघातातील त्या देहाची अवस्था वाईट होती.. चिरफाड करताना फासळ्यातून अवयवाचे भाग काढून डॉक्टर पाहणी करत होतो.. रात्री वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यामुळे कुजलेल्या मृतदेहांचा सहन करण्यापलीकडचा दरुगध अस्वस्थ करीत होता.. मुंबईतील बहुतेक शवागारांमधील स्थिती थोडय़ाफार फरकाने काहीशी अशीच आहे. या परिस्थितीत मृतदेह उचलणारे, त्यांची चिरफाड करणारे कामगार आणि डॉक्टरांचीही मागणी साधीच आहे, आम्हाला किमान माणूस म्हणून तरी वागवा हो.. हीच येथील सर्व कामगार आणि डॉक्टरांची व्यथा आहे.

खरे तर मंत्रालयात बसलेल्या ‘बाबू’ लोकांना (सचिव).. पोलीस आयुक्तांना एक  संपूर्ण दिवस आमच्यासोबत नुसते उभे जरी ठेवले तरी पुढचा आठवडाभर ते जेवणही करू शकणार नाहीत. आमची पदे भरायची वेळ आली की यांना ‘आकृतिबंध’ आठवतो.. पदे भरण्यावर बंदी असल्याचे सांगतात.. मृतदेहाच्या चिरफाडीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था जर यांना करता येत नसेल तर किमान चांगल्या दर्जाचे गाऊन, हातमोजे, बूट, साबण, पाण्याची व्यवस्था, जेवण करण्यासाठी एखादी चांगली खोली.. एखादा दूरचित्रवाणी संच.. हे आम्हाला का देऊ शकत नाहीत..

दिवसभर मृतदेहांची चिरफाड करून शिणलेल्या आमच्या मनाचा पर्यायाने आमच्या मानसिक आरोग्याचा विचार हे कधी तरी करणार आहेत का? अच्छे दिन.. ‘स्मार्ट सिटी’च्या बाता मारतात.. ते नेमके कुणासाठी करताहेत?  आपल्या रागाला तोंड फोडत ते कामगार बोलत होते.. पन्नास रुपये धुलाई भत्ता देतात हे आम्हाला.. यात कपडे खरेच धुऊन होतील का हो?.. पूर्वी म्हणजे १९८६ साली अंडी व दुधाचा आहार होता.. पुढे तो बंद केला.. वर आम्ही दारू पिऊन काम करतो.. लोकांकडून पैसे घेतो, असले आरोप करून हे वरचे लोक मोकळे होतात.. नेते-अधिकारी खोक्यांनी पैसे खाणार.. टेंडरवर टेंडर पचवून ढेकर देणार.. इथे येणाऱ्या मृतदेहालाही न्याय नाही आणि आमच्यासारख्या जिवंत कामगाराला कवडीची किंमत नाही. आलेला मृतदेह एचआयव्हीचा आहे.. त्याला क्षयरोग आहे की आणखी कोणता गंभीर आजार याची आम्हाला कल्पनाही नसते.. आमच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची आहे? साध्या झाडूने आणि पाण्याने येथे जमिनीवरील रक्ताचे डाग धुतले जातील का, चांगला साबण, आमच्या स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था करायला यांच्या बापाचे काय जाणार आहे..

तुम्हाला सांगतो, मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा सतत तीन दिवस-रात्र आम्ही कामगार व डॉक्टर काम करत होतो.. करकरेसाहेबांपासून या हल्ल्यात बळी पडलेल्या सामान्य माणसाचे शवविच्छेदन कशाचीही पर्वा न करता केले.. कोणालाच आम्हाला शौर्य पदक द्यावेसे का वाटले नाही, हा सवाल केवळ येथील कामगारांचाच नव्हे तर डॉक्टरांचाही आहे. त्या आधी मुंबईचे बॉम्बस्फोट, रेल्वेत झालेले भीषण स्फोट, मुंबई जलमय झालेले असताना कशाचीही पर्वा न करता दिवसरात्र आम्ही केलेल्या कामाची आजपर्यंत साधी पोचपावतीही कुणी दिली नाही.

मार्गदर्शक तत्त्वेही धाब्यावर

शवविच्छेदन करणारे एक डॉक्टर म्हणाले, इंग्लंडमधील ‘रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट’ने शवविच्छेदन केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या सुविधा असाव्यात याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यात डॉक्टर व कामगारांना टीबी, हेपटायटीस-बीसह अत्यावश्यक लसीकरण करणे, डोक्यावर टोपी, गॉगल, चेहरा झाकणारा मास्क, सर्जिकल गाऊन, वॉटरप्रूफ बूट, वॉटरप्रूफ अ‍ॅप्रन तसेच संपूर्ण शरीर झाकणारा त्यावर एक गाऊन, असे प्रत्येक शवविच्छेदनासाठी वापरणे बंधनकारक केले आहे. शवविच्छेदनासाठी वापरली जाणारी हत्यारे ही हाताला जखम न होणारी, जखम झाल्यास एचआयव्हीच्या गाइडलाइनप्रमाणे उपचाराची व्यवस्था तसेच कर्मचारी व डॉक्टरांच्या आरोग्याची नियमित तपासणी आदी अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही यादी बरीच मोठी होईल. आपल्याकडे कर्मचारीच नव्हे तर आम्हा डॉक्टरांनाही अंडी-दुधासह सकस आहार देणे आवश्यक असल्याचे एका डॉक्टरने सांगितले.