मुंबईत पुन्हा अंगावर आलेल्या करोनाला मुंबई महापालिका शिंगावर घेऊन संपवल्याशिवाय राहाणार नाही, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले. मागेल त्या करोना रुग्णाला तत्काळ रुग्णालयात खाट उपलब्ध होईल. आज २१ हजार खाटा उपलब्ध असून चार आठवड्यात तीन जम्बो रुग्णालयांच्या माध्यमातून तिसरी लाट आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी आणखी सहा हजार खाटा सज्ज असतील. करोना रुग्णांच्या चाचणीचे अहवाल दोन पाळ्यांमध्ये केले जातील व रुग्णांना २४ तासात ते उपलब्ध होतील, असे सांगून पंचतारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या रुग्णांसाठी आज रात्रीपर्यंत ताब्यात घेणार असल्याचे आयुक्त चहल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मुंबईकरांनो चॉईस ठेवू नका, मृत्यू वाढतायेत; महापौरांनी केलं महत्त्वाचं आवाहन

चार आठवड्यात सहा हजार खाटा उपलब्ध केल्या जाणार –
मुंबईतील वाढते करोना रुग्ण, रुग्णालयातील खाटांची परिस्थिती, चाचणी अहवाल मिळण्यास होणारा उशीर, रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे, पाच पेक्षा जास्त रुग्ण आढलेल्या व सील केलेल्या इमारतीतून कोणालाही पाच दिवस बाहेर पडता येऊ नये आदी अनेक उपाययोजनांसाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आज सकाळपासून पालिकेच्या १५८ अधिकाऱ्यांबरोबर झुम बैठक घेतली. या बैठकीला सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिष्ठाता तसेच प्रमुख अधिकारी आणि कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक आदी उपस्थित होते. या बैठकीबाबत आयुक्तांना विचारले असता, आजच्या दिवशी पालिकेकडे २१ हजार खाटा उपलब्ध असून त्यापैकी चार हजार खाटा रिकाम्या असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाला आता आम्ही शिंगावर घेणार असून आगामी चार आठवड्यात तीन जम्बो रुग्णालयात मिळून सहा हजार खाटा उपलब्ध केल्या जातील असे सांगितले. यात मालाड जम्बो केंद्रात २००० खाटा, सोमय्या ग्राऊंडवर २००० खाटा व क्रॉम्प्टन ग्रेव्हिज कंपनीत २००० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारले जाईल. मुख्य म्हणजे यापुढे रात्री उशीरा रुग्णांना बेड मिळत नाहीत तसेच नियंत्रण कक्षमध्ये फोन उचलत नाहीत अशी एकही तक्रार कोणाला करता येणार नाही. महापालिकेच्या सर्व जम्बो केंद्रात तसेच अन्य प्रमुख रुग्णालयात यासाठी रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. जम्बो केंद्रात उपअधिष्ठाता दर्जाचे अधिकारी असतील. एकूण ३१ अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नियंत्रण कक्षातून दूरध्वनी जाताच हे अधिकारी तत्काळ रुग्णालयात खाटांची व्यवस्था करतील असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाचे संपूर्ण कोविड रुग्णालयात रुपांतर करणार – आयुक्त चहल

पंचतारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या ताब्यात घेणार –
दक्षिण मुंबईत तीन हॉटेलमध्ये प्रत्येकी ५० खोल्या अशा १५० खोल्या आम्ही घेतल्या असून त्या बॉम्बे हॉस्पिटलला संलग्न केल्या आहेत. हॉस्पिटलमधील बरे झालेल्या रुग्णांना या हॉटेलामधील खोल्यांमध्ये आवश्यकतेनुसार ठेवले जाईल. येथे बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्णांची देखभाल करतील व बिल देखील रुग्णालयाच्या दराने आकारले जाईल. याशिवाय ताज, हॉटेल ताज, जे. डब्लू मॅरिएट तसेच हॉटेल रेनेसन्स या पंचतारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या आम्ही ताब्यात घेणार असून खासगी रुग्णालयात १० व्या दिवशी बरे झालेले मात्र पूर्णपणे बरे होऊ पाहणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांच्या मान्यतेने दाखल केले जाईल. हे रुग्ण कोणतीही साथ पसरवणारे नाहीत असे प्रमाणपत्र त्यांना डॉक्टरांकडून दिले जाईल. यामुळे मोठ्या खासगी रुग्णालयात गरजू रुग्णांना उपचारासाठी जास्तीतजास्त खाटा उपलब्ध होतील, असे आयुक्त चहल म्हणाले.

मुंबईत वीकएंड लॉकडाऊन दरम्यान घरपोच दारू विक्रीची परवानगी!

सील केलेल्या ८५० इमारतीतील नागरिकांना पाच दिवस बाहेर येजा करता येणार नाही –
मुंबईतील करोना चाचणी केंद्रात यापुढे २४ तासात रुग्णांना अहवाल मिळतील याची काळजी घेतली जाईल. यासाठी दोन पाळ्यात जमा होणाऱ्या नमुन्यांचा विचार केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून केल्या जाणाऱ्या घाऊक चाचण्यांचे अहवाल एक दिवस नंतर दिले तरी चालतील पण गंभीर व ज्यांची प्रयोगशाळेने घरी जाऊन चाचणी केली, असे अहवाल चोवीस तासात देणे बंधनकारक केले जाणार आहे. मुंबई पोलिसांशी आपले बोलणे झाले असून यापुढे पाच पेक्षा जास्त रुग्ण आढलेल्या ज्या ८५० इमारती सील केल्या आहेत तेथील नागरिकांना पाच दिवस बाहेर येजा करता येणार नाही, याची व्यवस्था करता येणार नाही याचीही काळजी घेतल्याचे आयुक्त म्हणाले. मुंबईत करोना वाढणार नाही तसेच रुग्णांना तत्काळ उपचार करून मृत्यू कमीतकमी होतील याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. करोनाने कितीही जोर लावला तरी मुंबई महापालिका करोनाला पुरुन उरेल असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.