News Flash

अटल स्मृती उद्यान हे भावी पिढय़ांचे प्रेरणास्थान : फडणवीस

उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाची दिलखुलास प्रशंसा करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव केला.

मुंबई : देशात नवभारताची संकल्पना रुजविणाऱ्या अटलजींचे स्वप्न साकार करण्याचे काम करणारी पिढी आज देशात कार्यरत आहे. अटलजींचे स्मारक ही भावी पिढय़ांची प्रेरणा ठरेल, असे उद्गार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले. बोरिवलीच्या शिंपोली परिसरात मुंबई उपनगराचे पालकमंत्री व बोरिवलीचे आमदार विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अटल स्मृती उद्याना’च्या लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

अटल स्मृती उद्यान हे विनोद तावडे यांचे सर्वोत्तम काम आहे. अटलजींचे विचार, व्यक्तिमत्त्व जिवंत करणारा हा विलक्षण प्रकल्प आहे. निस्पृहता हे अटलजींचे वेगळेपण होते. अटलजी हा भारतीय राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांनी देशाला जगात उंची मिळवून दिली. भारत काय आहे हे अटलजींनी जगाला दाखवून दिले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अटलजींच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाची दिलखुलास प्रशंसा करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव केला. अटलजी हे केवळ नेते नव्हते, आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, असे सांगत ठाकरे यांनी वाजपेयी यांच्यासोबतच्या काही कौटुंबिक आठवणींचाही उल्लेख केला.

या समारंभात प्रारंभी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीच्या गदा भेट दिल्या होत्या. त्याचा आवर्जून उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, या गदा आम्ही आता एकमेकांविरुद्ध वापरणार नाही, तर दोघे मिळून विरोधकांना गदागदा हलविणार आहोत. आता कोणत्याही कार्यकर्त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही, अशी कोटी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. भाजपने कितीतरी पराजय पाहिले पण कोणाही अध्यक्षाने राजीनामा दिला नाही, अशी कोपरखळी मारून ठाकरे यांनी अटलजींच्या संघर्षमय कारकीर्दीचा गौरव केला, तेव्हा संपूर्ण सभागृहात हास्याची कारंजी फुलली होती. अटलजींची पिढी सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी जगली. प्रतिकूल काळातही आपल्या विचारातून अटलजींसारख्या नेत्याने जे पेरलं, ते आज उगवलंय! या मोठय़ा माणसांच्या पाऊलखुणा ही आपल्या वाटचालीची पाऊलवाट आहे, असे ते म्हणाले.

जगभरात जे जे चांगलं आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे या ध्यासाने काहीतरी वेगळं करायचं, यावर आपला नेहमीच प्रयत्न असतो, असे सांगत विनोद तावडे यांनी या प्रकल्पाची संकल्पना विशद केली. अटलजींनी पक्ष मोठा केला, पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला मोठं केलं, त्याचे ऋण फेडण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असून अटलजींच्या विचारांची प्रेरणा भावी पिढय़ांना अखंडपणे मिळावी म्हणून हे उद्यान उभारण्याचा संकल्प सोडला, असे तावडे म्हणाले. सोहळ्याच्या प्रारंभी, लोकसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी मताधिक्य मिळविणारे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी तसेच अन्य मान्यवरांचा विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

* बोरिवलीच्या शिंपोली परिसरात हे अटल स्मृती उद्यान उभे राहिले असून बाजूलाच मेट्रो रेल्वेचेही स्थानक होणार आहे. या स्थानकास अटल स्मृती उद्यान स्थानक असे नाव द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलताना विनोद तावडे यांनी केली होती. आपल्या भाषणात ते नमूद करून, मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडे तसा आग्रह मी धरेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:33 am

Web Title: atal smriti udyan cm devendra fadnavis shiv sena chief uddhav thackeray zws 70
Next Stories
1 घसरलेले विमान हटवण्याचे काम अजूनही सुरूच
2 मुख्यमंत्री येता दारा, होई रस्ता गोजिरा!
3 पालिका पूल खरवडणार!
Just Now!
X