आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपाबाबत अनेकदा चर्चेची मागणी करूनही सेना-भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका झाल्याने युतीबरोबरचा राजकीय संसार तडीस जाईल का, अशा संभ्रमातही हे कार्यकर्ते सापडले आहेत.
गेल्या वर्षी मुंबई महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत लवकरात लवकर वाटाघाटी सुरू कराव्यात, असे  आवाहन शिवसेना व भाजपला करण्यात आले होते. त्यानंतरही आठवले सातत्याने तशी मागणी करीत आहेत. कुणाच्या वाटय़ाला किती आणि कोणत्या जागा येणार आहेत, हे एकदा ठरले, की त्यादृष्टीने तयारी करायला सोपे जाईल. त्यासाठी ही चर्चा लवकर सुरू करावी, असे आठवले यांचे म्हणणे आहे. मात्र त्याला शिवसेना व भाजपच्या नेतृत्वाकडूनही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा सेना-भाजपकडून वेगळी काय वागणूक मिळत आहे, अशी चर्चा आरपीआयमध्ये सुरू आहे. निवडणुकांमध्ये ओढून-ताणून महायुतीची मोट बांधली जाईल, परंतु त्यात आरपीआयला काय भवितव्य राहील, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.