नोटाबंदीची मुदत आज, ३० डिसेंबरला संपली, त्यामुळे आता एटीएममधून हव्या त्या वेळी हवे तेवढे पैसे काढता येतील, अशी तुमची अपेक्षा असेल तर ती फोल ठरणार आहे. कारण अजूनही अनेक एटीएम केंद्रे रोख रकमेच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट होत आहे. नोटांच्या उपलब्धतेअभावी देशभरातील सव्वा दोन लाख एटीएमपैकी फक्त ४० टक्के एटीएमच कार्यान्वित असून त्यांतूनही ग्राहकांना पुरेशी रक्कम मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. फिडेलिटी इन्फॉर्मेशन सव्‍‌र्हिसेस या कंपनीच्या १२ हजार एटीमपैकी केवळ ३७ टक्के एटीएममधूनच पुरेशी रक्कम मिळत असल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी वेंकटाचलम यांनी सांगितले. तर एनसीआर कॉर्पोरेशन या कंपनीनेही अशीच प्रतिक्रिया नोंदवली आहे. बँकांकडून पुरेशी रक्कमच उपलब्ध होत नसल्याने आम्हालाही एटीएममध्ये रक्कम मर्यादित प्रमाणात भरावी लागत असल्याचे एनसीआर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवरोझ दस्तुर यांनी सांगितले. आम्ही एटीएम केंद्रांसाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली तर त्याच्या एकतृतीयांश रक्कमच बँकांकडून आम्हाला प्राप्त होते आणि त्याचा परिणाम देशभरातील एटीएम केंद्रांच्या कार्यावर झाला, असे दस्तुर म्हणाले. तर अनेकविध कारणांमुळे पाच ते दहा टक्के एटीएम बंद असल्याचे त्यांनी सांगितले.