मलबार हिलसारख्या उच्चभ्रू वस्तीतील एटीएम सेंटर लुटण्याच्या कटात सहभागी असलेल्या त्या एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. या सुरक्षा रक्षकाने आपल्या तीन साथीदारांसह हे एटीएम लुटण्याचा कट केला होता. गुरुवारी मध्यरात्री हे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तिघांना मशीन उघडता आले नाही. त्यामुळे त्यांनी तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहिले असता त्यात हे लुटारू एटीएमच्या सुरक्षा रक्षकासह बोलत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या आधारे पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली. मात्र, त्याचे साथीदार अद्यापही फरार आहेत.
मलबार हिल भागात देना बँकेच्या एटीएम सेंटरवर राजकुमार चौधरी (३१) हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलीवरून आलेले तीन तरुण जबरदस्तीने एटीएम सेंटरमध्ये शिरले. खूप खटाटोप करूनही त्यांना एटीएम मशिनचे टाळे तोडता आले नाही. त्यामुळे त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला. या वेळी एटीएममध्ये २४ लाख रुपयांची रक्कम होती.
दरम्यान, एटीएममध्ये तोडफोड झाल्याचे लक्षात आल्यावर बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एटीएम सेंटरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहिले असता हे तीन तरुण एटीएमपासून थोडय़ा अंतरावर या सुरक्षा रक्षकाशी गप्पा मारत असल्याचे त्यांना दिसले. त्या आधारे त्यांनी राजकुमारची चौकशी सुरू केली. अखेर पोलिसांनी खाकी इंगा दाखवल्यानंतर राजकुमारने आपलाही या कटात सहभाग असल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.