सोशल साईटस्, चॅटिंगचा वापर करून कट रचल्याप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने सायबर दहशतवादाचा पहिला गुन्हा दाखल करून त्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. देशात सायबर दहशतवादप्रकरणी पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल झाले आहे. हे आरोप सिद्ध झाले तर संबंधित आरोपीला जन्मठेप होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनिस अन्सारी याला ऑक्टोबर महिन्यात दहशतवादविरोधी विभागाने अटक केली होती. त्याच्यावर वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकन स्कूल बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त करण्याचा कट रचल्याचा आरोप  होता. परदेशातील त्याचा साथीदार उमर इल्हाजी याच्याशी झालेल्या संभाषणावरून गुन्हा दाखल झाला होता. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ एफ हे सायबर दहशतवादाशी संबंधित गुन्ह्य़ाचे कलम त्याच्यावर लावण्यात आले होते. आता शिवडी न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे.