मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील ‘अल्फा केमिकल्स’ या कारखान्यावर धाड घालून ‘एमडी’ या अत्यंत घातक अमली पदार्थाचा कोटय़वधींचा साठा हस्तगत केला. या कारखान्यात ‘एमडी’व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पादन होत नव्हते.

एटीएसचे उपायुक्त विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक आणि पथकाने बुधवारी या करखान्यावर धाड घातली. तेथे चार कोटींचे तयार एमडी आणि सुमारे सव्वा कोटी रुपयांचे कच्चे साहित्य आढळले. या साहित्यातून ८० कोटी रुपयांचे एमडी तयार होऊ शकले असते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नायक आणि पथकाने विलेपार्ले येथून महेंद्र पाटील आणि संतोष आडके यांना ‘एमडी’ विकताना अटक केली होती. तेव्हा दोघांनी सासवड येथील कारखान्यात मुख्य उत्पादनाआड ‘एमडी’ची निर्मिती केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पथकाने सासवड येथील कारखाना आणि विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानावर छापे घालून सुमारे १४ किलो एमडी हस्तगत केले होते.

यापैकी आडके याच्या बँक खात्यावरील व्यवहारांचा तपास पथकाने तपास सुरू केला. त्यात काही व्यवहार संशयास्पद होते. त्याबाबत तपास केल्यावर आडके याचा पुरंदर येथे एक कारखाना असून तेथे फक्त ‘एमडी’ची निर्मिती केली जाते, असे स्पष्ट झाले. या कारवाईनंतर जुहू पथकाने आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.