पुण्याच्या जंगली महाराज मार्गावर झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींवर लावण्यात आलेला ‘मोक्का’ हटविण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेले अपील दाखल करून घेत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी निर्णयाला स्थगिती दिली. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने यांनी पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एल. पानसरे यांच्या २ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. तसेच प्रकरणाची सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. दहशतवादी कारवाया पैशांसाठी केल्या जात नाहीत. तर संघटीत गुन्हेगारी ही पैशांसाठी असल्याने आरोपींवर ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत न्या. पानसरे यांनी ‘मोक्का’ रद्द केला होता आणि खटला नियमित न्यायालयाकडे वर्ग करण्याची विनंती प्रधान न्यायाधीशांकडे केली होती. ‘मोक्का’ आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) या दोन्ही कायद्याअंतर्गत एकाचवेळी कारवाईही करता येत नसल्याचे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले होते. परंतु एटीएसला या निर्णयाविरोधात अपील करता यावे याकरिता न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती.