ठाणे येथील कापूरबावडी भागात पत्नी आणि तिच्या मित्रावर पतीने चाकूहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी याच भागातील सिनेवंडर मॉलमधील वाहनतळात एका २१ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला झाला. हल्लेखोर सुजीत घावट (वय २६) याला नागरिकांनी पकडून कापूरबावडी पोलिसांच्या हवाले केले. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या मॉलमधील दुकानात हे दोघे काम करीत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी सुजीतने काम सोडले होते. एकत्र कामाला असल्याने त्यांची ओळख होती. मंगळवारी सायंकाळी सुजीत तेथे आला व त्याने तिला भेटण्यासाठी बोलाविले. त्यामु़ळे ती वाहनतळाजवळ आली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याने संतापलेल्या सुजीतने तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि पळ काढायचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.