अनधिकृत बांधकामे पाडताना जेसीबी चालक जखमी; ७२५ बांधकामे तोडली
कुर्ला येथील तानसा जलवाहिनीजवळील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात गेलेल्या पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांवर १० ते २० जणांच्या टोळक्याने हल्ला चढविला. त्यात जेसीबी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या या कारवाईत ७२५ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनीलगतची अनधिकृत बांधकामे तोडण्याचा पालिकेच्या एम-पश्चिम विभाग कार्यालयाने निर्णय घेतला. पालिका परिमंडळ पाचचे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली एम-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. पात्रताधारक असलेल्यांना पालिकेच्या धोरणानुसार यापूर्वीच पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील आदर्श नगर व शास्त्री नगर परिसरात शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरू असताना १०-२० जणांचा जमाव तेथे आला आणि त्यांनी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात जेसीबी चालक धर्मेद्र यादव गंभीर जखमी झाले. धर्मेद्र यादव यांच्या डोक्याला मोठी जखम झाली असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांमध्ये पालिकेने ७२५ अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई केली असून त्यात ५२८ निवासी, ८४ व्यावसायिक आणि इतर ११३ अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
एक कार्यकारी अभियंता, चार सहाय्यक अभियंता, सहा उप अभियंता, १६ कनिष्ठ अभियंता, १६० कामगार या कारवाईत सहभागी झाले होते. पाच जेसीबी आणि सात डम्परचा वापर या कारवाईत करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक आणि ६० पोलीस हवालदारांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये ही कारवाई पार पडली.