प्राणवायूची पातळी घसरली, अतिदक्षता विभागात न्या, ही मागणी पूर्ण न झाल्याने रागाच्या भरात एका रुग्णाने करोना केंद्रातील परिचारिके वर चाकूने हल्ला करत पळ काढला. पोलिसांनी त्याला शोधले आणि वरळी येथील केंद्रात उपचारार्थ दाखल केले.

गेल्या आठवड्यात ही घटना दक्षिण मुंबईतील एलिजाबेथ रुग्णालयात घडली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रुग्णाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. हा रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

ना. म. जोशी मार्ग परिसरात राहाणाऱ्या या रुग्णाला १३ एप्रिलला एलिजाबेथ रुग्णालयातील करोना केंद्रात दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिलला दुपारी त्याने अचानक प्राणवायूची पातळी घसरली, श्वास घेण्यास त्रास होत आहे, अतिदक्षता विभागात हलवा, अशी मागणी केली. परिचारिकेने प्राणवायू तपासून रुग्णास शांत होण्यास सांगितले. परिस्थिती ठिक असून अतिदक्षता विभागात हलविण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले. याचा राग आल्यामुळे मध्यरात्री दोनच्या सुमारास या रुग्णाने परिचारिके वर चाकूने हल्ला केला. मध्ये पडलेल्या डॉक्टर, परिचरावरही हा रुग्ण धावून गेला. हल्ला के ल्यावर त्याने केंद्राबाहेर धूम ठोकली. या घटनेची माहिती केंद्रातील संबंधितांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षास दिली. मलबार हिल पोलिसांना माहिती मिळताच संबंधित रुग्णाचा शोध सुरू झाला. हा रुग्ण रस्त्यावरून चालत जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. परिचारिका किरकोळ जखमी झाली.