पोलिसांना मारहाण करणे अत्यंत चुकीचे असून वेळ पडल्यास पोलीस वेगळी भूमिका घेतील. पण पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही असा इशाराच  राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी दिला आहे. पोलिसांवर हात उगारल्यास कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कल्याणमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून  मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. वारंवार पोलिसांवर होणा-या हल्ल्यावर सतीश माथूर यांनी चिंता व्यक्त केली आहे.  नागरिकांनी आणि पोलिसांनी एकमेकांशी विनाकारण  वाद घालू नये असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांवरील हल्ला म्हणजे सर्वसामान्य माणसावरील हल्ला आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांच्या कारवाईबाबात काही आक्षेप असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.

एक वाहतूक पोलीस शिपाई लाखो गाड्यांचं ट्रॅफिक नियंत्रित करतो. त्यामुळे लोकांनीही पोलिसांना समजून घ्यावे आणि कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे असे माथूर म्हणालेत. पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली काम करु नये.  आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेप होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर सणासुदीच्या काळात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. त्याला नागरिकांनी बळी न पडता प्रत्येक संदेशाची खातरजमा करावी आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे त्यांनी सांगितले.